नवी दिल्ली : आता उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तुम्ही नवीन एसी किंवा पंखा घेण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण, केंद्र सरकारने आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे. एका नव्या योजनेनुसार एलईडी दिव्यांप्रमाणेच आता सरकार पंखे आणि एसी कमी दरात विकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्या मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार आता सरकारी कंपनी 'एनर्जी एफिशिअंट कंपनी लिमिटेड' हे या पंख्यांची आणि एसीची निर्मिती करणार आहे. फाईव्ह स्टार रेटिंगचे हे पंखे असणार आहेत. 


विशेष म्हणजे पंखे आणि एसी बाजारात मिळणाऱ्या इतर कंपन्यांच्या उत्पादनांपेक्षा स्वस्त असणार आहेत. हा पंखा १००० रुपयांत उपलब्ध असेल. तर त्याच प्रकारचा खाजगी कंपनीचा पंखा बाजारात १५०० रुपयांना उपलब्ध आहे. या उत्पादनांमुळे ३५ टक्के ऊर्जेची (वर्षाला १५० यूनिट्सची) बचत होणार असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे. 


ही सरकारी उत्पादने सामान्य नागरिकांसाठी ईएमाआय स्वरुपात उपलब्ध करुन देणार आहे. वीजबिलात वाचणाऱ्या पैशांतून हे हप्ते देता येतील, असं सरकारचं म्हणणं आहे. मध्यमवर्गीय घरांत सर्वात जास्त वीज पंखे आणि एसीवर वापरली जाते. त्यामुळेच वीजबचतीसाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.  


'डोमेस्टिक एफिशियंट लाईटिंग प्रोग्राम' योजनेच्या माध्यमातून सरकारने गेल्या वर्षीपासून सात कोटी एलईडी लाईट्सचे वितरण केले आहे. आता त्यापुढे जाऊन सामान्य नागरिकांना सरकारी एसी आणि सरकारी पंखे दिल्यामुळे हा उन्हाळा गारेगार होण्याची शक्यता आहे.