चेन्नई : बंगालच्या खाडीत उत्पन्न झालेलं वरदा या चक्रीय वादळामुळे आंध्रप्रदेश आणि तमिलनाडूच्या किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ सध्या आंध्रप्रदेशमधील नेल्लोरपासून ८२० किलोमीटरवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी हे वादळ चेन्नईमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 'वरदा' वादळाचा सामना करण्यासाठी तमिळनाडूमध्ये एनडीआरएफच्या ७ आणि आंध्रप्रदेशमध्ये ६ तुकड्या पाठवल्या गेल्या आहेत.


'वरदा' वादळापासून बचाव करण्यासाठी भारतीय हवाई दल सुद्धा हाय अलर्टवर आहे. मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तमिळनाडू सरकारने काही महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहेत. रविवारी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली यावर बैठक झाली. पूर्वतयारीचा यामध्ये आढावा घेण्यात आला.


हवामान खात्याने सांगितलं की 'सोमवारी हे चक्रीय वादळ आंध्रप्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर आणि चेन्नई जवळील उत्तर किनाऱ्याला पार करेल. त्यानंतर याचा जोर जरा कमी होईल'. राज्यातील वीज मंडळाला वादळापूर्वी वीज बंद करण्यास सांगण्यात आलं आहे.


वरदा या वादळामुळे पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हवेचा वेग ४० ते ५० किलोमीटर असू शकतो. समुद्रात देखील लाटा उसळण्याची शक्यता आहे.