अश्वनीकुमार गुप्ता, मुंबई : 58 वर्षीय डॉरिस फ्रांसिस हिला दिल्ली एनसीआरचे लोक ओळखतात कारण एनएच 24 वर ट्राफिक कंट्रोल करताना ती नेहमीच दिसायची... पण आता ती दिसत नाही... कारण आता ती लढा देतेय कॅन्सरशी... तिच्या मदतीसाठी खुद्द पंतप्रधानांनी हात पुढे केले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांना मदत करणारी आज स्वत: अडचणीत सापडलीय... डॉरिस फ्रांसिसचा कॅन्सरशी लढा सुरू आहे. हातात काठी आणि रस्त्यांवर शिट्टी वाजवणारी डॉरिस फ्रांसिस ट्राफिक पोलीस नाही किंवा चालान कापणारी ट्राफिक इन्स्पेक्टरही नाही... लोकांना ट्राफिक जाममधून मार्ग दाखवणारी डॉरिस फ्रांसिस... डॉरिसचा फक्त एकच उद्देश होता... गाजियाबादच्या NH24 वरून जाणाऱ्यांना सुरक्षितरित्या रस्ता पार करून देणं... ट्रॅफिकमध्ये अडकलेल्यांना मदत करताना डॉरिसनं कधीही ऊन-थंडी-पावसाची तमा बाळगली नाही... पण डॉरीसचं हे मिशन सध्या थांबलंय. कारण डॉरिसला कॅन्सरनं ग्रासलंय.


आठ वर्षांपासून रस्ता पार करण्यासाठी लोकांना मदत करणाऱ्या डॉरिसला अशा कठीण समयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीचा हात दिलाय. निस्वार्थ भावनेनं लोकांना मदत करणाऱ्या डॉरिसला कॅन्सर झाल्याचं कळताच मोदींनी तिच्या उपचारांसाठी तीन लाखांची मदत जाहीर केली. पंतप्रधांनांनी डॉरिसला पत्र लिहून मदत करत असल्याचं सांगितलं. 


वयाच्या 58 व्या वर्षी लोक निवृत्तीनंतर आरामात आयुष्य घालवणं पसंत करतात. डॉरिस मात्र या वयात रस्त्यावर उभी राहून लोकांना मदत करते. पण अशातच एक दिवस अचानक पोटात कळ आली आणि डॉरिसला गर्भाशयाच्या कॅन्सर असल्याचं लक्षात आलं. या बातमीनं डॉरिसच्या कुटुंबीयांना धक्का बसला. पण या कठीण काळातही डॉरिसनं धीर सोडला नाही.


समाजातल्या सर्व स्तरांतून मदत 
कॅन्सरसारखा रोग, त्यात आर्थिक चणचण यामुळं डॉरिसचं आयुष्य समस्याग्रस्त होऊन बसलं. तरीही कुटुंबियांनी तिला एम्समध्ये दाखल केलं. पण त्यावेळी हातात पैसे नसल्यानं त्यांच्या मुलीनं स्वत:ची बाईक विकली. डॉरिसच्या आजाराबद्दल कळताच गाझियाबादच्या मॅक्स हॉस्पिटलनं तिच्या उपचारांची जबाबदारी उचलली. सर्जरीनंतर आता तिचे उपचार मॅक्स हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. तिच्या प्रकृतीत आता झपाट्यानं सुधारणा होतेय.


सामाजिक संघटनांनी डॉरिसच्या मदतीसाठी निधी उभारायला सुरूवात केलीय. या हायवेच्या दीदीला वाचवण्यासाठी नोएडा आणि गाझियाबादच नाही तर इतर राज्यांमधल्या लोकांकडूनही मदत मिळतेय. 


तुम्हालाही मदत करायची असेल तर...
जर तुम्हालाही या हायवेच्या दीदीला मदत करायची असेल तर 9958513432 या क्रमांकावर संपर्क करू शकता. तुमच्या मदतीनं डॉरिस पुन्हा एकदा ठणठणीत होऊन तिचं मिशन पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरु शकेल.