कैराना : 1990 मध्ये जसं काश्मीरमधून पंडितांना स्थलांतरित व्हावं लागलं तशीच परिस्थिती उत्तर प्रदेशमधल्या कैरानातल्या हिंदूंची झाली आहे. झी मीडियानं हे भीषण वास्तव जगासमोर आणलं आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातलं शामली जिल्ह्यातलं कैराना हे छोटसं शहर आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत कैराना शहर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिक मानलं जातं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आज परिस्थिती पालटली आहे. शहरातल्या हिंदू परिवारांना इथे राहणं मुश्किल झालं आहे. गेल्या दोन वर्षात शहरातल्या शेकडो हिंदू कुटुंबांनी स्थलांतर केलंय. वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधली सत्यता पडताळ्यासाठी झी मीडियाची टीम कैरानात पोहचली.  शहरात फिरताना लोकांच्या चेहऱ्यावर दहशत स्पष्ट दिसत होती. जिथे बघावं तिकडे लटकलेली कुलप आणि भयाण शांतता होती. शहरातली परिस्थिती डोळ्यांना दिसत असली, तरी घाबरलेले नागरिक कॅमेरावर बोलयाला तयार नव्हते.


या लोकांशी बोलल्यावर परिस्थिती हळूहळू स्पष्ट झाली. कैराना शहरात 92 टक्के मुस्लिम आणि 8 टक्के हिंदू लोक आहेत. दोन वर्षांपूर्वी शहरातलं वातावरण अगदी उत्तम होतं.  पण मुज्जफरनगरच्या दंगलीनंतर सारं काही पालटलं. दोन वर्षांपूर्वी खंडणीसाठी दिवसाढवळ्या एका व्यापाऱ्याची हत्या झाली. आणि त्यानंतर अल्पसंख्याक हिंदू कुटुंबांना राहणं मुश्किल झालं.


ही स्थिती कैराना पुरती मर्यादित नाही. आजूबाजूच्या परिसरातले व्यापारीही या शहरातल्या हिंदूंच्या स्थितीबद्दल बोलण्यास नकार देतायत. काही दिवसांपूर्वी शामलीचे खासदार हूकूम सिंह यांनी हा मुद्दा चर्चेला आणला, पण विरोधक हा मुद्दा फक्त निवडणूकीचा फंडा असल्याचं सांगितलं. 


गेल्या अनेक दिवसांपासून कैरानातल्या हिंदूंच्या पलायनाच्या बातम्या पश्चिम उत्तर प्रदेशच्या वर्तमान पत्रातून झळकत आहेत.  वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा काहीही फरक पडलेला नाही.


आता हा मुद्दा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतही चर्चेला आलाय. त्यामुळे येत्या काही दिवसात उत्तर प्रदेशातलं राजकारण तापणार असंच चित्र आहे.