नवी दिल्ली : समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री अखिलेश यादव बैठकीत भाषण देतांना भावूक झाले. त्यांनी म्हटलं की, माझे पिता माझे गुरु आहेत. त्यांनी मला अन्यायाविरोधात लढायला शिकवलं. मी वेगळा पक्ष का काढू. काही लोकं गैरसमज पसरवत आहेत. मी त्यांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झालो. अखिलेश यादव यांनी बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची देखील तयारी दाखवल्याचं म्हटलं जातंय. 


पक्षाच्या सर्व महत्त्वपूर्ण नेत्यांची लखनऊमध्ये बैठक सुरु झाली आहे. मुलायम सिंह यादव यांनी सोमवारी निर्णय घेईल असं म्हटलं होतं. एकीकडे मुलगा तर दुसरीकडे भाऊ आणि पक्षनिष्ठ नेता याबाबत मुलायम सिंह यादव यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे आता ते काय निर्णय घेतील याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात उफळून आलेला वाद हा मुलायम यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. याचा परिणाम निवडणुकीवर होतांना दिसणार आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय हा समाजवादी पक्षाचं पुढचं भविष्य ठरवणार आहे.