आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो अच्छे दिन येणार पण...
वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.
मुंबई: वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. या अहवालामध्ये महगाई कमी राहिल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पुढच्या आर्थिक वर्षामध्ये महागाईचा दर 4 ते 4.50 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसंच व्याजदरामध्ये कपात होऊ शकते, ज्याचा फायदा कार आणि घर कर्ज तसंच पर्सनल लोन घेतलेल्यांना होईल. महागाई कमी झाल्यामुळे व्याजदरांमध्ये कपात होईल असं सांगण्यात आलं असलं तरीही या सगळ्या गोष्टी शेवटी आरबीआयच्या हातामध्ये आहेत.
महागाई नियंत्रणात असली तरीही आरबीआय मात्र व्याजदरांमध्ये कपात करण्यासाठी उत्सुक दिसत नसल्याचं चित्र आहे. व्याजदर कमी झाले तर पुन्हा एकदा महागाई वाढेल अशी भीती वाटत असल्यानं आरबीआय सावध पावलं टाकत असल्याचं बोललं जात आहे.