...अखेर `शक्तीमान`चा पाय कापावा लागला!
सोमवारी डेहराडून शहरात एका मोर्च्याच्या वेळी पोलीस बंदोबस्तात सामील असताना जखमी झालेला घोडा शक्तिमान याचा पाय आता कापावा लागला आहे.
डेहराडून : सोमवारी डेहराडून शहरात एका मोर्च्याच्या वेळी पोलीस बंदोबस्तात सामील असताना जखमी झालेल्या घोड्याचा अखेर पाय कापावा लागलाय. 'शक्तिमान' असं या घोड्याचं नाव आहे. आठ डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर ही यशस्वी शस्त्रक्रीया केलीय.
शक्तीमानच्या पायाला झालेल्या जखमेनंतर सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. यानंतर अनेक ठिकाणांहून डॉक्टरांच्या काही पथकांना पाचारण करण्यात आलं. पण, जखमेमुळे घोड्याच्या पायाला झालेलं गँगरीन शरीरभर पसरुन त्याच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे, अखेर डॉक्टरांनी एका शस्त्रक्रियेद्वारे त्याचा पाय कापण्याचा निर्णय घेतला.
सध्या, शक्तीमानला एका खोट्या पायाद्वारे आधार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, हा असा पाय २००-३०० किलो वजन असणाऱ्या घोड्यांना लावला जातो. शक्तीमानचे वजन मात्र ४०० किलो आहे. त्यामुळे त्याला तो पाय कितपत लाभदायक ठरेल, याविषयी आपण साशंक असल्याचे डॉक्टरांनी म्हटलंय.
आता पुढील तीन दिवस तो पशू वैद्यांच्या निगराणीखाली राहणार आहे. त्यानंतर त्याचे निरीक्षण करुन त्याला कायमस्वरुपी कृत्रिम पाय लावायचा की नाही? याचा निर्णय घेतला जाणार आहे. यात परदेशातील काही पशूवैद्यांचाही सल्ला घेतला जात आहे.