तिसरी नापास, पण आज मात्र पद्मश्री पुरस्काराचे मानकरी
मुंबई : तिसरीत असताना शाळा सोडली, गरिबीमुळे शिक्षण सोडावं लागलं...
मुंबई : तिसरीत असताना शाळा सोडली, गरिबीमुळे शिक्षण सोडावं लागलं... पण, आज मात्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलाय... ही कथा आहे ओदिशातील हलधर नाग यांची... आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्यांचं नावही ऐकलं नसेल. पण, सोमवारी मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारानंतर नाग चर्चेत आलेत.
हलधर नाग तिसरीत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांना शाळा सोडावी लागली. पण, तरी साहित्याची आवड असल्याने त्यांनी एक कविता लिहिली. ही कविता त्यांच्या गावातील एका स्थानिक मासिकात छापून आली. यानंतर त्यांनी आणखी काही कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांचे कौतुक सुरू झालं आणि त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.
आज ६६ वर्षे वय असणाऱ्या हलधर नाग यांनी कोसली भाषेत आजवर शेकडो कविता लिहिल्यात. २० महाकाव्य लिहिली. विशेष म्हणजे या सर्व कविता आणि ही २० महाकाव्य त्यांना तोंडपाठ आहेत. गावागावांत जाऊन ते आपल्या कविता लोकांना ऐकवतात. त्यांना कोणत्याही कवितेचे नाव सांगितले की ते ती कविता न वाचता ऐकवतात, असे त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीनं म्हटलंय.
हलधर दररोज तीन ते चार कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून आपल्या कविता सादर करतात. हलधर यांच्या कवितांची महती इतकी आहे की आता त्यांच्या साहित्याचा समावेश संबळपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होणार आहे. आजवर एकूण पाच जणांनी हलधर यांच्या साहित्यावर आधारित पीएचडी प्रबंध लिहिले आहेत.
एके काळी एका हलवायाच्या दुकानात भांडी घासणाऱ्या हलधर नाग यांनी नंतर त्यांच्याच गावात एका शाळेत आचाऱ्याचे कामही केले आहे. यानंतर त्यांनी कर्ज काढून शालेय साहित्याचे दुकान काढले. यातून येणाऱ्या पैशांतून ते आपली गुजराण करतात.
ते आजही धोतरी आणि बंडीशिवाय दुसरा कोणताही पोशाख घालत नाहीत. इतकंच काय ते कधीही चपला घालत नाहीत. हलधर नाग यांना ओदिशात 'लोककवी रत्न' नावाने ओळखतात. गाव, धर्म, निसर्ग, सामाजिक प्रश्न अशा सर्वच विषयांवर त्यांनी साहित्याची रचना केली आहे. 'आजच्या तरुणांना कोसली भाषेतील कवितांमध्ये रस आहे ही चांगली बाब आहे. प्रत्येकजण कवी असतो, मात्र थोड्याच लोकांमध्ये त्या कवितेला आकार देण्याची कला असते,' असं हलधर यांचं म्हणणं आहे.