`आयर्न लेडी`चं १६ वर्षांचं उपोषण संपणार, मणिपूर निवडणूक लढवणार
सशस्त्र दलाचा विशेषाधिकार कायदा म्हणजेच `आफ्सपा` हटवण्याची मागणी करत गेल्या १६ वर्षांपासून सुरु असलेलं शर्मिला इरोम यांचं उपोषण लवकरच संपुष्टात येणार आहे.
नवी दिल्ली : सशस्त्र दलाचा विशेषाधिकार कायदा म्हणजेच 'आफ्सपा' हटवण्याची मागणी करत गेल्या १६ वर्षांपासून सुरु असलेलं शर्मिला इरोम यांचं उपोषण लवकरच संपुष्टात येणार आहे.
मणिपूरची 'आयर्न लेडी' इरोम शर्मिला यांनी स्वत: आज ही घोषणा केलीय. येत्या ९ ऑगस्ट रोजी त्या आपलं उपोषण संपवणार आहेत... याचसोबत त्यांनी आणखी एक निर्णय घेतलाय... तो म्हणजे मणिपूर विधानसभा निवडणूक लढवण्याचा...
लढाई कायम राहील...
एका स्थानिक न्यायालयातून बाहेर पडताना ४४ वर्षीय मानवाधिकार कार्यकर्ता इरोम यांनी मीडियासमोर ही घोषणा केलीय. 'माझ्या उपोषणामुळे आफ्सपा हटेल अशी आशा मला वाटत नाही... त्यामुळे, मी आता राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, ही लढाई कायम राहील' असं त्यांनी यावेळी म्हटलंय. २०१७ साली मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत.
हॉस्पीटल आणि तुरुंग
२००० सालापासून शर्मिला इरोम यांनी अन्न-पाण्याचा त्याग केलाय. मरणाला टेकलेल्या शर्मिला यांना इंफाळच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात नाकात ट्यूब टाकून जबरस्तीनं आहार दिला जातोय. या हॉस्पीटलचं एक विशेष वॉर्ड त्यांच्यासाठी तुरुंगच बनलंय. त्यांना वारंवार आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येतेय.
१६ वर्षांपासून उपोषणावर
१४ मार्च १९७२ रोजी जन्मलेल्या शर्मिला या सशस्ज्ञ दल विशेषाधिकार कायदा हटवण्याच्या मागणीसाठी १ नोव्हेंबर २००० पासून उपोषणावर आहेत. तेव्हा त्या २८ वर्षांच्या होत्या. आसाममध्ये रायफलच्या जवानांकडून कथित रुपात १० नागरिकांना ठार मारल्याविरुद्ध त्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं.
शर्मिला इरोम यांचे रेकॉर्ड
इरोम यांच्या नावावर आत्तापर्यंत दोन रेकॉर्ड आहेत... पहिला म्हणजे सर्वाधिक काळ उपोषणावर बसण्याचा आणि दुसरं म्हणजे सर्वाधिक वेळा तुरुंगातून सुटण्याचा... २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तानं त्यांना एमएसएननं 'वूमन आयकॉन ऑफ इंडिया' म्हणून नावाजलं गेलं होतं.