GSAT - 9 उपग्रहाचं आज प्रक्षेपण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतल्या `दक्षिण आशियाई उपग्रह` अर्थात GSAT - 9 उपग्रहाचं आज प्रक्षेपण होणार आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतल्या 'दक्षिण आशियाई उपग्रह' अर्थात GSAT - 9 उपग्रहाचं आज प्रक्षेपण होणार आहे. तामिळनाडू इथल्या इस्रोच्या श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रातून संध्याकाळी ४ वाजून ५७ मिनिटांनी त्याचं प्रक्षेपण केलं जाणार आहे.
सार्क समुहातील भारताबरोबर इतर सात देशांसाठी 'सार्क' उपग्रहाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये नेपाळमधल्या १८ व्या सार्क परिषदमध्ये मांडली होती. मात्र पाकिस्ताननं या उपग्रहाचा वापर करण्यास नकार दिला. त्यामुळे सार्क ऐवजी दक्षिण आशियाई उपग्रह असं या उपग्रहाचं नामकरण करण्यात आलं आहे.
आप्तकालीन परिस्थितीमध्ये संपर्कासाठी, संदेशवहनासाठी या उपग्रहाचा प्रामुख्यानं वापर केला जाणार आहे. तसंच डीटीएच सेवेसाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.
या उपग्रहाची आणि प्रक्षेपणाची आणखी काय वैशिष्ट्ये :
GSAT - 9 भुस्थिर कक्षेत भ्रमण करणार.
उपग्रहाचे वजन २२३० किलो.
उपग्रहाचा कार्यकाल १२ वर्षांपेक्षा जास्त.
GSLV या प्रक्षेपकाद्वारे - रॉकेटेद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण होणार
GSLV मध्ये स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन असणार आहे.
हे उड्डाण यशस्वी झाल्यास स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर केलेले GSLV चे सलग ४ थे यशस्वी उड्डाण ठरेल.
आत्तापर्यंत GSLV प्रक्षेपकाची १० पैकी ५ उड्डाण अयशस्वी ठरल्यानं GSLV ला नॉटी बॉय ( naughty boy ) म्हणूनही ओळखले जाते.