नवी दिल्ली : पंतप्रधान कौशल्य विकास योजना म्हणजेच कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी भारत सरकारनं स्कील इंडिया योजना आखली. या योजनेचं साधर्म्य सांगत गुडगावमधील काही भामटे बेरोजगारांना नोकरीचं आमीष दाखवत त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या प्रफुल्ल देशमुख यांचीही अशीच फसवणूक करण्यात आली. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेची जाहिरात एका वर्तमानपत्रात वाचनात आली. ही जाहीरात वाचून प्रफुल्लनं अर्ज दाखल केला. तेवीसशे रुपये भरून त्याची नोंदणी केली गेली. यानंतर सरकारच्या कॉल सेंटरसाठी तुमची निवड करण्यात आली आहे, तुम्हाला 22 हजार 500 रुपये दरमहा वेतन असेल. राहणं खाणं आणि इतर सुविधाही मिळतील, अशा आशयाचं पत्र प्रफुल्लला मिळालं.


या पत्रावर हरियाणातील गुडगावचा पत्ता होता. यानंतर प्रफुल्लला फोन आला आणि 12 हजार रुपये भरण्यास सांगितले. हे पैसे भरण्यासाठी त्याला दोन अकाऊंट नंबर दिले गेले, पण या प्रकाराबद्दल प्रफुल्लच्या वडिलांना शंका आली.


या प्रकरणाचा शोध घेतला असता फसवणूक करणा-या टोळीनं अधिकृत योजनेसारखी बनावट वेबसाईट तयार केली होती. तरुणांना देण्यात येणा-या नेमणूक पत्रातील हरियाणातील गुडगावचा पत्ताही बोगस असल्याचं समोर येत आहे.


या  फसवणूक प्रकाराची चाळीसगाव पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार देण्यात आलीय. पोलिसांनी या प्रकाराच्या मुळाशी जाऊन यामागच्या सुत्रधारांना जेरबंद केलं पाहिजे. म्हणजे बेरोजगार तरुणांच्या फसवणुकीला आळा बसेल.