कर्नाटक पोलिसांची दडपशाही, जय महाराष्ट्र घोषणा दिल्याने आमदारांवर गुन्हा
कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. बेळगावमध्ये काढलेल्या मोर्चात जय महाराष्ट्रसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनीगुन्हा दाखल केलाय.
बेळगाव : कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. बेळगावमध्ये काढलेल्या मोर्चात जय महाराष्ट्रसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील यांच्यासह मोर्चा आयोजक आणि इतरांवरही कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
यावर जय महाराष्ट्र म्हणणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. ते म्हणण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. हिम्मत असेल तर आपली आमदारकीच रद्द करा, असे थेट आव्हानच आमदार संभाजी पाटील यांनी कर्नाटक सरकारला दिले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक केंद्राने बोलवून, सीमाप्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, बेळगाव सीमेवर कर्नाटक पोलिसांची शिवसेना नेते दिवाकर रावतेंना नोटीस बजावली. सरकारी आदेशाचं कारण देत रावते माघारी फिरले. तर जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्यावरुन आमदार संभाजी पाटलांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.