लखनऊ ऑपरेशन : 11 तासांच्या चकमकीनंतर दहशतवाद्याला कंठस्नान
उत्तर प्रदेशात निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच, राजधानी लखनौमध्ये चकमकीत अतिरेक्याला ठार मारण्यात आलं.
लखनऊ : उत्तर प्रदेशात निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच, राजधानी लखनौमध्ये चकमकीत अतिरेक्याला ठार मारण्यात आलं.
लखनौच्या सीमेवरील काकोरी भागातल्या एका घरामध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यानं बेछूट गोळीबार केला. सैफूल्ला असं या अतिरेक्याचं नाव आहे. एटीएसचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संशयित दहशतवादी आयएसआयएसचा सक्रीय सदस्य होता.
तब्बल अकरा तास हे ऑपरेशन सुरु होतं. अखेर मध्यरात्री चकमकीत हा अतिरेकी ठार झाला.
भोपाळ उज्जैन रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातला तो संशयित आरोपी असल्याचं समजतंय. याप्रकरणी कानपूरमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीनं सैफुल्लाची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली होती.
त्यानुसार एटीएस पथक त्याला अटक करण्यासाठी पोहोचले असता, संबंधित अतिरेक्यानं बेछूट गोळीबार सुरू केला.
एटीएसचे किमान 20 कमांडो या चकमकीत सहभागी झाले होते. याच बरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील ट्रेन स्फोटाशी आयसिस या दहशतवादी संघटनेचा संबंध असल्याचे म्हटलंय.