देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस `संरक्षण मंत्री` म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणखी जवळ जाणार का? अशी जोरदार चर्चा सध्या राज्य आणि केंद्र पातळीवर सुरू आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'संरक्षण मंत्री' म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणखी जवळ जाणार का? अशी जोरदार चर्चा सध्या राज्य आणि केंद्र पातळीवर सुरू आहे.
मनोहर पर्रिकर यांनी केंद्रातील संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देत गोव्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलंय. यानंतर आता या जागेवर कोण विराजमान होणार? याबद्दल जोरात चर्चा सुरू आहे. 'झी न्यूज'च्या सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रीपदी महाराष्ट्राचे सद्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाचा विचार केंद्रीय पातळीवर सुरू आहे.
भाजपाध्यक्ष अमित शहा तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक फडणवीसांना फायदेशीर ठरू शकते. भाजपच्या पहिल्या फळीतील नेते मानले जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची आत्तापर्यंत कामगिरी पाहता, या शक्यतेची जोरदार हवा राजकीय वर्तुळात वेगानं पसरतेय.
पर्रिकरांनंतर 'संरक्षण मंत्रीपदी' बसू शकणाऱ्या यादीतील देवेंद्र फडणवीस हे 'टॉप फेव्हरेट' नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.