गोवा : मंगळवारी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी मगोपचे सुदिन ढवळीकर यांची वर्णी लागलीय. पर्रिकरांसोबतच एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात गोवा फॉरवर्डचे 3, 2 अपक्ष, 2 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपच्या 2 आमदारांनी शपथ घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी, गोव्याचे मावळते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पदासोबतच 'मुख्यमंत्री' असं लिहिलेला टेबलावरचा बोर्डही पर्रिकरांकडे सरकावावा लागला. त्याचं झालं असं की, स्टेजवर मनोहर पर्रिकर आणि पार्सेकर शेजारी शेजारी बसले होते... समोरच्या टेबलावर 'चिफ मिनिस्टर' असं लिहिलेला बोर्ड पार्सेकरांच्या समोर ठेवण्यात आला होता. पार्सेकरांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी सहजच हात पुढे करून हा बोर्ड बाजुलाच बसलेल्या पर्रिकरांच्या बाजुला सरकावला. 



पार्सेकरांचा पराभव... 


2012 मध्ये गोव्यात मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली भाजपनं बहुमताचा आकडा गाठला होता. त्यानंतर 2014 मध्ये संरक्षण मंत्री म्हणून पर्रिकरांनी केंद्राच्या राजकारणात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पर्रिकरांनंतर मेंड्रम मतदारसंघातून निवडून आलेल्या पार्सेकरांना गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली होती. परंतु, यंदा मात्र आपली जागाही न वाचवता आलेल्या पार्सेकरांना आपला पराभव मान्य करावा लागला. काँग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी जवळपास  5000 मतांच्या फरकानं पार्सेकर यांना पछाडलं. गेल्या शनिवारीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.