पणजी : संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी मगोपचे सुदिन ढवळीकर यांची वर्णी लागलीय. गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत एकूण नऊ आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी, पर्रिकर यावेळी तरी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष आपल्या पदावर कायम राहणार का? अशी चर्चा मात्र जोरात होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी तीन वेळा मुख्यमंत्री बनलेल्या मनोहर पर्रीकर यांनी एकदाही मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला नाही. पर्रिकरांनी 2000 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आज चौथ्यांदा पर्रीकरांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय. आता तरी ते आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार का? हे येणारा काळच ठरवेल. 


2012 मध्ये गोव्यात मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली भाजपनं बहुमताचा आकडा गाठला होता. त्यानंतर 2014 मध्ये संरक्षण मंत्री म्हणून पर्रिकरांनी केंद्राच्या राजकारणात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा एकदा पर्रिकरांनी केंद्रातलं मंत्रिपद सोडून गोव्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलंय.


मनोहर पर्रिकर यांच्यासोबत सुधीन ढवळीकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे प्रमुख), विजय सरदेसाई, फ्रान्सिस डिसोजा, मनोहर आजगावकर, रोहन खवटे (अपक्ष), पांडुरंग मडकईकर (भाजप), गोविंद गावडे (अपक्ष) विनोद पालयेकर (गोवा फॉरवर्ड), जयेश साळगावकर (गोवा फॉरवर्ड) यांनीही शपथ ग्रहण केलीय. या शपथविधीसाठी भाजपाध्यक्ष अमित शाह, व्यंकय्या नायडू, जे पी नड्डा हेदेखील उपस्थित होते.