पणजी : गोवा विधानसभेत भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसले तरी छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं मनोहर पर्रिकर उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात पर्रिकर यांच्या बरोबर राज्यपाल मृदुला सिन्हा भाजपचे चार, मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रत्येकी दोन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देतील. दोन अपक्ष आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. या सरकारला राष्ट्रवादी आणि आणखी एका आमदाराने पाठिंबा दिल्याने भाजपचा सरकार बनविण्याचा मार्ग आणखीनच प्रशस्त झाला आहे.


भाजपतर्फे पांडुरंग मडकईकर ,माविन गुदिनो, मायकल लोबो, डॉ प्रमोद सावंत यांना मंत्री बनविण्यात येणार आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि बाबू आजगावकर शपथ घेतील. गोवा फॉरवर्ड पार्टीतर्फे विजय सरदेसाई आणि विनोद पालियेकर यांना मंत्रिमंडळात घेण्यात येणार आहे. तर अपक्ष आमदार गोविन्द गावडे आणि रोहन खंवटे पहिल्यांदाच मंत्रिपदावर विराजमान होतील.