नवी दिल्ली : दिल्लीत मराठी मुलांना मारहाण झाल्याप्रकरणी काँग्रेस खासदार रजनीताई पाटील यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. झी 24 तासनं सर्वप्रथम ही बातमी दाखवत मराठी मुलांवर झालेल्या अन्याय अत्याचार समोर आणला होता. रजनीताई पाटील यांनी झी २४ तासचं नाव घेत राज्यसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा मांडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी विद्यार्थ्यांवर दिल्लीत लाठीचार्ज झाल्याची घटना 'झी 24 तास'नं दाखवल्यानंतर शिवसेनेनं यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना खासदारांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विरोधकांनी या प्रकाराची दखल घेत रेल्वेमंत्र्यांवर आणि केंद्रावर तोफ डागली आहे.


शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही घेतली दखल


रेल्वे अॅप्रेंटिसच्या मुलांना रेल्वेत सामावून घेण्यासाठी आंदोलन करणा-या मराठी मुलामुलींवर दिल्लीतील रेल्वे मंत्रालयासमोर लाठीचार्ज झालाय. यात महाराष्ट्रातली अनेक मुलं जखमी झालीयत. मारहाणीनंतर या सर्व मुलामुलींना संसद मार्ग पोलीस ठाण्यात डांबण्यात आलं. मराठी मंत्री म्हणून सुरेश प्रभूंकडे हे विद्यार्थी आले असता त्यांना काठ्या खाव्या लागल्यायत. 


ही घटना झी 24 तासनं दाखवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याची त्वरीत दखल घेतली आहे. मराठी मुलांवर अन्याय होऊ देऊ नका, असे आदेश शिवसेनेच्या खासदारांना दिलेत. खासदार आनंदराव आडसूळ आणि खासदार चंद्रकांत खैरे मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांनी संसद मार्ग पोलिसांना जाब विचारला. 


शिवसेना खासदारांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांना रोजगार देता येत नसेल तर कौशल्य विकास कशासाठी राबवता? असा सवाल खैरेंनी सरकारला केला. 


महाराष्ट्रातल्या दीड हजार मुलांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी स्वेच्छा मरण देण्यासंदर्भातचे पत्र चंद्रकांत खैरेंना दिलंय. गोव्यात उद्धव ठाकरेंनीही या प्रकारावर भाष्य करताना केंद्रावर तोफ डागली.


मुंबईत राज ठाकरेंनीही आपल्या भाषणात या प्रकरणावरुन सरकारला लक्ष्य केलं. राज्यात प्रचाराची राळ उडालीये. रेल्वेमंत्री मराठी असतानाही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लाठ्या खाव्या लागतायेत.  हा आयता मुद्दा विरोधकांच्या हाती लागलाय. मराठमोळे प्रभू हा प्रश्न कसा सोडवतायेत. हे बघणं महत्वाचे आहे.