मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती... समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं... पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणा-या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणा-या महामानवाला 'झी २४ तास'चाही सलाम.


सामाजिक न्यायाचं प्रतिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर... भारतातील दलित, शोषीत, पीडित, आदिवासी समाजाला स्वाभिमानानं जगण्याचं बळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. शेकडो वर्षांपासून जातीपातीच्या श्रृंखलेत अडकेल्या दलित समाजाला मुक्त करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी देश आणि समाज  घडवण्यासाठी आपलं जीवन खर्ची केलं. त्यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर लढा दिला. 


आधुनिक भारताच्या निर्मितीत बाबासाहेबांचं योगदान अनन्य साधारण आहे. स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलनासोबतच साधन संपत्तीचे फेरवाटप,सर्वांना शिक्षण,धर्मचिकित्सा यासाठी बाबासाहेबांनी लढे उभारले. सर्व क्षेत्रामध्ये दलित, भटके विमुक्त, इतर मागास, अल्पसंख्यांक, महिला यांना प्रतिनिधित्व मिळावं, यासाठी त्यांनी आग्रह धरला. समाजातील दबल्या पिचलेल्यांना बाबासाहेबांनी अस्मिता मिळवून दिली. विविध क्षेत्रातील या बहुमोल योगदामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आज सामाजिक न्यायाचे प्रतिक बनलेले आहेत.


स्वस्त विजेचा ध्यास


बाबासाहेब हे काळाच्या पुढे पाहणारे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते होते. अर्थ, शेती, सिंचन, ऊर्जा अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी केलेलं कार्य अतुलनिय असंच आहे. आज शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना बाबासाहेबांनी शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार मांडला होता. 


देशातील प्रमुख नद्यांवर धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प त्यांनी हाती घेतले होते. भारतीयांना वीज तर मिळालीच पाहिजे मात्र ती जगातील सर्वात स्वस्त वीज असली पाहिजे असं मतं बाबासाहेबांनी २५ ऑक्टोबर १९४३ ला ऊर्जा विभागाविषयीच्या भाषणात व्यक्त केलं होतं.


दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला खरी गरज बाबासाहेबांच्या द्रष्टेपणाची... 


बाबासाहेबांनी देशातील शेती आणि शेतकऱ्यांचा सखोल अभ्यास  केला होता. १९१८ साली त्यांनी शेतीवर 'स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया' हा शोधनिबंध लिहिला होता. पीढीगणिक शेतीच्या होणाऱ्या वाटणीमुळे उभ्या राहणाऱ्या प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं. या समस्यावर बाबासाहेबांनी तुकडेबंदीचा उपाय सूचवला होता. तसेच शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍यांना आपली मुले इतर व्यवसायात धाडण्याचा सल्ला दिला होता.


पुढच्या साठ वर्षांची ध्येयधोरणं... 


बाबासाहेबांच्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे आहेत. अन्नधान्य वृद्धीसोबतच त्यांनी दळणवळणाची साधने विकसीत करण्यावर भर दिला. त्यातूनचं जलवाहतुकीचा विकास आणि विस्तारावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना बाबासाहेबांनी १९४२ मध्ये दिली होती. पुढच्या साठ वर्षात भारताला पाण्याची किती आवश्यकता लागणार आहे आणि त्याची पूर्तता कशी करता येईल, याचा आराखडा तयार करण्याची सूचना त्याकाळी डॉ. बाबसाहेबांनी संबंधीत विभागाला दिली होती.


भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे याविषयी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१९ साली 'साउथबरो कमिशन'समोर मागणी केली होती. पुढे राज्यघटनेच्या मध्यमातून तो त्यांनी प्रत्येक भारतीयाला मिळवून दिला. बाबासाहेब हे सच्चे राष्ट्रभक्त, राष्ट्रीय नेते होते. या देशातील प्रत्येक नागरिकाची ओळख ही जात, धर्म, प्रदेश, भाषा यावरून न होता ती केवळ 'भारतीय' म्हणून असली पाहिजे, असं त्यांचं स्पष्ट मतं होतं. 


आपण राष्ट्र म्हणून उभे राहायचे असले तर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त त्यांचे हे अनमोल विचार पायाभूत मानावे लागतील.