वायूदलाच्या हरवलेल्या विमानाचा शोध सुरु
भारतीय वायूदलाचं एएन-32 हे विमान शुक्रवारी गायब झालं आहे. 24 तासानंतरही या विमानाचा शोध अजूनही लागलेला नाही.
चेन्नई : भारतीय वायूदलाचं एएन-32 हे विमान शुक्रवारी गायब झालं आहे. 24 तासानंतरही या विमानाचा शोध अजूनही लागलेला नाही. या विमानाला शोधण्याची मोहिम सुरु झाली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये या विमानाचा शोध सुरु आहे. या विमानाला शोधण्यासाठी एक पाणबुडी, तटरक्षक दलाच्या 13 नौका आणि आठ विमानं वापरण्यात येत आहेत.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या शोधमोहिमेचा आढावा घेतला. पी8आय या विमानातून पर्रिकर यांनी शोधमोहिमेची माहिती घेतली. शुक्रवारी चेन्नईकडून पोर्ट ब्लेअरला हे विमान जात होतं, पण 8 वाजून 46 मिनीटांनी विमानाचा संपर्क तुटला.
या विमानामध्ये दोन वैमानिक, एक दिशादर्शक, तीन जवान, हवाई दलाचे 11 जवान, लष्कर, नौदल, तटरक्षक दलाचे सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय असे एकूण 29 जण होते.