नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक आनंदाची बातमी आहे. २०१४ साली सर्वसाधारण निवडणुकांमध्ये दिसलेली 'मोदी लाट' आजही मध्यम वर्गात मोठ्या प्रमाणात असल्याचं एका सर्वेक्षणातून पुढे आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईटी आणि टीएनएस यांनी ३ लाख ते २० लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांचं एक सर्वेक्षण केलं. हे सर्वेक्षण नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकता, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांमध्ये करण्यात आलं. निदान या गटातील नागरिकांमध्ये तरी नरेंद्र मोदी आज सर्वात लोकप्रिय आहेत. 


सर्वेक्षण करण्यात आलेल्या व्यक्तींनी नरेंद्र मोदींना १० पैकी ७.६८ गूण देण्यात आले आहेत. त्यांच्या पाठोपाठ क्रमांक लागतो तो अर्थमंत्री अरुण जेटली यांचा. त्यांना १० पैकी ५.६८ गूण मिळाले आहेत. तर राहुल गांधी यांना १० पैकी ३.६१ गूण मिळाले आहेत. 


या सर्वेक्षणादरम्यान लोकांनी दिलेल्या उत्तरांनुसार मध्यम वर्गात आजही मोदींच्या एनडीए सरकारविषयी उत्सुकता आहे. तब्बल ४५% लोकांनी ते मोदींच्या कारकीर्दीतील आर्थिक वृद्धीविषयी संतुष्ट असल्याचं म्हटलं आहे. तर ४१% लोकांनी ते समाधानी असल्याचं म्हटलं आहे. १४% लोकांनी ते मोदींच्या आर्थिक धोरणांविषयी आणि आर्थिक प्रगतीविषयी असमाधानी असल्याचं म्हटलं आहे. 


मोदींच्या 'अच्छे दिन'विषयी प्रश्न केला असता ५८% लोकांनी मोदींच्या कालखंडात अच्छे दिन येण्याची आशा असल्याचं म्हटलं आहे. तर ३३% लोकांनी परिस्थिती जैसे थे राहील असं म्हटलं आहे. फक्त ८% लोकांनी परिस्थिती आणखी बिकट होईल अशी भीती दर्शवली आहे. 


तर राष्ट्रवादाच्या मुद्यावर ४८% लोकांनी हा मुद्दा मोठा करण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. केवळ ११% लोकांनी भाजपला या वादासाठी जबाबदार धरलं आहे. 


म्हणजे दिल्ली, बिहार यांसारख्या राज्यांमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला असला तरीही केंद्रात सरकार स्थापनेसाठी शहरी मध्यम वर्गात मोदींच्या नावालाच मोठी पसंती मिळत असल्याचं समोर येत आहे.