नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाची सर्वत्रच चर्चा आहे. विरोधकांना धारेवर धरल्याचं त्यांच्या समर्थकांना फार कौतुक वाटतंय. पण, आता स्मृती इराणी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुकाची थाप दिलीये. या भाषणाची लिंक त्यांनी ट्वीट करुन 'सत्यमेव जयते. स्मृती इराणींचं भाषण ऐका' असं ट्वीट त्यांनी केलंय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल विरोधी पक्षांना उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या 'माझं नाव स्मृती इराणी आहे. मी तुम्हाला आव्हान देते की माझी जात काय आहे ते ओळखून दाखवा. मी अमेठीतून निवडणूक लढवल्याने तुम्ही मला शिक्षा देऊ पाहाताय.'


'माझ्या कर्तव्याचे पालन मी केले आहे. मी त्यासाठी कोणाचीही माफी मागणार नाही,' असेही त्या पुढे म्हणाल्या. 'ज्याप्रमाणे काँग्रेसजनांच्या शिफारसीसाठी मी पत्र लिहिते त्याचप्रमाणे मी विद्यापीठांतल्या गैरकारभारांसंबंधीही पत्र लिहिते. त्यात चूक ते काय?,' असा सवाल त्यांनी विराधकांना केला. 


विरोधकांची टर उडवताना त्या म्हणाल्या की 'मी एका अतिसूक्ष्म अल्पसंख्यांक समुदायातून (पारशी) महिला असल्याने तुम्ही मला बोलू देत नाहीत.' या भाषणादरम्यान त्या भावनिकही झाल्या. रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारणही सुरू असल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.


या भाषणादरम्यान त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीवरही घणाघाती टीका केली. त्यांच्या या भाषणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.