श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये कठुआ सेक्टरमधल्या बॉर्डरवर जाऊन नाना पाटेकरने आज बीएसएफ जवानांची भेट घेतली. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर काही दिवसांपूर्वीपर्यंत सतत भडीमार सुरू होता. पण गेल्या काही दिवसांपासून ही फायरींग थांबलीय. त्यात नाना पाटेकरने थेट सीमेवर जाऊन जवानांसोबत वेळ घालवला.


जवानांचं मनोबल उंचावलेलंच असतं. त्यांच्यासोबत आम्ही आहोत हे त्यांना सांगण्यासाठी आपण इथे आल्याचं नाना म्हणाला. नानाने यावेळी बीएसएफ वापरत असलेल्या अत्याधुनिक शस्त्रसामुग्रीचीही माहिती घेतली. त्यानंतर नाना बीएसएफ अधिकाऱ्यांसह थेट फॉर्वर्ड पोस्टवर पोहोचला. तिथे त्याने प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या भारतीय चौकीला भेट दिली. प्रहार या सिनेमाच्या शुटींगसाठी नानाने एकेकाळी मिलिटरी ट्रेनिंग घेतलं होतं. त्यानंतर आज नाना पुन्हा एकदा भारतीय जवानांसोबत सीमेवर रमला.