मोदी अॅप : नोटबंदीवर सरकारला 90 टक्के जनतेचा पाठिंबा
नोटबंदीच्या निर्णयावर 90 टक्के जनतेकडून सरकारला पाठिंबा मिळाल्याचं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय.
नवी दिल्ली : नोटबंदीच्या निर्णयावर 90 टक्के जनतेकडून सरकारला पाठिंबा मिळाल्याचं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नोटबंदीच्या निर्णयावर जनतेचा कौल मागितला.... आपला निर्णय चूक आहे की बरोबर हे जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी अॅपवरील एका सर्व्हेत लोकांना सहभागी व्हायचं आवाहन केलं... यामध्ये जनतेला 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. या सर्व्हेतून समोर आलेले निष्कर्ष खु्द्द पंतप्रधानांनी बुधवारी ट्विट केलेत.
काय आहे सर्व्हेचा निष्कर्ष...
पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या निष्कर्षांनुसार, 98 टक्के लोकांच्या मते, भारतात काळा पैसा आहे. 90 टक्के लोकांनी 500 आणि 1000 च्या नोटा बॅन करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला आपला पाठिंबा नोंदवलाय.
43 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, नोटबंदीच्या निर्णयामुळे त्यांना कोणताही त्रास झालेला नाही. 48 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना त्रास झाला असला तरी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी ते थोडा फार त्रास सहन करण्यासाठी तयार आहेत.
99 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार भारतात भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांची समस्या आहे... आणि त्याविरुद्ध लढण्याची आणि समूळ नष्ट करण्याची गरज आहे. 92 टक्के लोकांच्या मते भ्रष्टाचाराविरुद्ध मोदी सरकारचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
92 टक्के लोकांच्या मते, नोटबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवादाला थोपवण्यासाठी मदत मिळेल.