मुंबई : नुकतंच मुकेश अंबानींच्या बहुचर्चित आणि महत्त्वकांक्षी 'रिलायन्स जिओ' लोकांसमोर आला... यावेळी, जिओच्या जाहिरातींवर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत होता. पंतप्रधानांचा फोटो खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिरातींवर छापणं बेकायदेशीर नाही का? असा सूर आता सोशल मीडियावर उमटताना दिसतोय. ,


सोशल मीडियावर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओच्या जाहिरातींवर नरेंद्र मोदी यांच्या निळ्या जॅकेटमधला फोटो छापला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १.२ अब्ज भारतीयांसाठी पाहिलेल्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला आपण वाहून घेतल्याचं यात 'जिओ'नं म्हटलंय. पण, खाजगी जाहिरातीवर पंतप्रधानांचा फोटो लावणं कायदेशीर आहे का? असा सवाल सोशल मीडियात उपस्थित केला जातोय.  


इतकंच नाही तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या निमित्तानं मोदींवर  निशाणा साधलाय. 'मोदीजी तुम्ही रिलायन्सच्या जाहिरातींसाठी मॉडेलिंग करत राहा... देशातले सगळे कामगार मिळून तुम्हाला २०१९ मध्ये धडा शिकवतील' असं केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटलंय. 


काय म्हणतो कायदा...


नियमानुसार, कोणतीही व्यक्ती लिखित मंजुरीशिवाय राष्ट्रीय ओळख असलेल्या फोटोंचा वापर आपल्या हितासाठी करू शकत नाही. (उदा. राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय चिन्ह, पंतप्रधान आणि राष्ट्रपती इ.)... असे फोटो वापरायचे असतील तर यासाठी केंद्र सरकार किंवा केंद्र सरकारनं नियुक्त केलेला योग्य अधिकारीच यासाठी मंजुरी देऊ शकतात. १ सप्टेंबर १९५० पासून हा कायदा लागू आहे. रिलायन्सनं पंतप्रधानांचा फोटो छापण्याअगोदर यासाठी मंजुरी मिळवली आहे किंवा नाही? याबद्दल साशंकता व्यक्त केली जातेय.