मुंबई : यंदाच्या वर्षी वेळेआधी मान्सूनने अंदमानात हजेरी लावलीये. तीन दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झालाय. त्यानमुसार देशभरातही मान्सूनची हजेरी लवकर लागणार आहे. हवामान खात्याने देशातील विविध भागात मान्सून कधी पोहोचेल याची सामान्य तारीख आपल्या वेबसाईटवर दिलीये. सध्या असलेली स्थिती कायम राहिली तर खालील तारखेला पाऊस त्या त्या भागांमध्ये हजेरी लावू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ जूनपर्यंत - साधारणपणे २५ मे ते एक जूनपर्यंत मान्सून तामिळनाडू, केरळ आणि उत्तर पूर्व भागात दाखल होतो. १ जूनपर्यंत ज्या भागात पाऊस दाखल होण्याचा अंदाज असतो ती शहरे चेन्नई, मदुराई, सालेम, कोची, कोलम ही आहेत. या तारखेला मान्सून संपूर्ण तामिळनाडूत व्यापण्याचा अंदाज असतो. केरळ, मिझोरम, त्रिपुराच्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरु होतो. 


५ जूनपर्यंत - ५ जूनपर्यंत संपूर्ण केरळात मान्सून व्यापतो. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात मान्सूनची हजेरी लागते. मंगलोर, म्हैसूर, बंगळुरु, तिरुपती, अनंतपूर, नेल्लोर या भागांमध्ये हजेरी लागते. ५ जूनपर्यंत उत्तर पूर्व भारतात पाऊस पडण्यास सुरुवात होते. 


१० जूनपर्यंत - १० जूनपर्यंत मान्सून ओडिशाचा किनारा पार करतो. यासोबतच महाराष्ट्राच्या अधिकांश भागात पाऊस होतो. पश्चिम बंगाल तसेच बिहारमध्ये मान्सून दाखल होतो. मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद, निजामाबाद, करीमनगर, विशाखापट्टणम, विजयनगरम, भुवनेश्वर, कटक, हल्दिया, कोलकाता, वर्धमान, आसनसोल, भागलपूर, पूर्णियाय या भागांमध्ये मान्सूनची हजेरी लागते. 


१५ जून - १५ जून म्हणजेच आतापासून एक महिन्यानंतर देशातील दोन तृतीयांश भागात मान्सून व्यापतो. १५ जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये मान्सून दाखल होतो. यावेळी उत्तर प्रदेशातही पाऊस दाखल होतो. 


१ जुलै - या तारखेपर्यंत मान्सूची गती मंदावते. १५ जून ते १ जुलैदरम्यान मान्सून देशातील ९० टक्के भागांमध्ये दाखल झालेला असतो. यादरम्यान संपूर्ण उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मान्सूनचे आगमन होते. १ जुलैपर्यंत ज्या भागात मान्सून दाखल होतो त्यात उद्यपूर, भीलवाडा, अजमेर, जयपूर, भरतपूर, कोटा, ग्वालियर, झांसी, लखनऊ, कानपूर, आग्रा, मथुरा, गाझियाबाद, मेरठ, डेहराडून, शिमला, गुरुग्राम, सोनीपत या शहरांचा समावेश होतो. यासोबत पुढील १५ दिवसांत मान्सून संपूर्ण भारतभर पसरतो.