नवी दिल्ली : नोटबंदीवरून विरोधकांनी सुरू केलेला विरोध संपलेला नाही. विरोधकांच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. आज सकाळी संसदेचे कामकाज सुरु झाले. यावेळी विरोधक पुन्हा आक्रमक दिसलेत. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सातव्या दिवशीही संसदेचे कामकाज गोंधळामुळे होऊ शकले नाही. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत का उपस्थित राहत नाहीत, असा पवित्रा विरोधकांनी घेत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नोटाबंदी मुद्यावर मोदी सरकारसोबत 28 नोव्हेंबरपर्यंत कोणतीही चर्चा न करण्याचा विरोधी पक्षांचा निर्णय घेतल्याची माहिती एएनआयने दिलेय.


संसद अधिवेशनाच्या सातव्या दिवशीही गोंधळ सुरूच आहे. आजही कामकाज सुरू होताच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांचा गोंधळ पाहायला मिळाला. राज्यसभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना बोलू द्यावं, यासाठी विरोधक आक्रमक होते. मात्र नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा हवी असेल, तर त्याचं औपचारिक निवेदन द्या आणि मगच बोला, अशी भूमिका अर्थमंत्री अरूण जेटलींनी घेतली.


या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानंतर राज्यसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. तर लोकसभेत समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी कागद फाडून फेकल्यामुळं गोंधळाचं वातावरण तयार झालं. त्यामुळं लोकसभेचं कामकाजही बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. चार आठवड्याच्या संसद अधिवेशनचा दुसरा आठवडा कामकाजाविना खंडित झाल्यामुळे सरकारने विरोधकांशी चर्चेची तयारी दर्शवलीय. नोटबंदीचा मुद्दा संसदेमध्ये चांगलाच गाजत आहे. सलग सातव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्याचेच पडसाद पाहायला मिळाले.


दरम्यान, संसदेचे कामकाज सुरू करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग आज सर्वपक्षीय बैठक बोलवली. या बैठकीत विरोधकांच्या मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच, संसदेतील कामकाज सुरूळीत चालवण्याची विनंतीही केली जाणार आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.