नवी दिल्ली : 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्याचा निर्णय लागू झाल्यापासून म्हणजेच 10 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबरपर्येंत बँकांमध्ये तब्बल आठ लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपये जमा झाले आहे.  तर जनतेनं याच काळात दोन लाख सोळा हजार रुपयांची रोकड आपल्या बँक खात्यातून काढली आहे. रिझर्व्ह बँकेनं सोमवारी संध्याकाळी ही आकडेवारी जारी केली.   


पैसे काढण्यावरच्या मर्यादा हटावल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या निर्देशांनुसार बँकेत जाऊन पैसे काढण्यावरच्या मर्यादा हटावण्यात आल्या आहेत. पण एटीएममधून पैसे काढण्यावरच्या मर्यादा मात्र कायम आहेत. गेल्या काही दिवसामध्ये नव्या 2000 आणि 500च्या नोटांसह सध्या चलनात असणाऱ्या 100, 50,20,10 आणि 5 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात बँकांमध्ये भरण्यासाठी येत नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले आहे. त्याचं कारण पैसे काढण्यावर असल्याची मर्यादा असल्याचं समोर आले आहे.


पैसे काढण्यावर मर्यादा असल्यानं लहान किमतीच्या नोटा बँकांमध्ये येत नाही. म्हणूनच आज पासून ग्राहक सध्या चलनात असलेल्या नोटांच्या स्वरुपात जितके पैसे बँकेत भराल तितकी त्या ग्राहकाची काढण्याची मर्यादा वाढत जाणार आहे.  म्हणजेच तुम्ही 2000, 500, 100, 50,20, 10 आणि 5 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात जितकी रक्कम बँकेत भराल तितकी रक्कम तुम्हाला बँकेतून काढता येईल.  


दरम्यान  जे ग्राहक पैसे भरणार नाहीत, त्यांना मात्र 24 हजार रुपयांची मर्यादा कायम असेल.  शिवाय मोठ्या रकमा काढताना ग्राहकांना पाचशे आणि दोन हजाराच्याच नोटा देण्यात येतील असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केले आहे. सोमवारपर्यंत बँकेच्या खात्यातूनही आठवड्याला फक्त 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा होती, तर एटीएममधून दिवसाला फक्त अडीच हजार रुपये काढण्याची मुभा होती. नव्या परीपत्रकात एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.