नोटाबंदी : असं एक गाव... जिथं ना रांगा आहेत ना सुट्या पैशांची चिंता
केंद्र सरकारनं नोटा रद्द केल्यानंतर बँका, एटीएमसमोर रांगा नाहीत, असं एकही गाव सापडणार नाही. देशात एक गाव असं आहे जिथं ना रांगा आहेत ना सुट्या पैशांची चिंता.
साबरकाठा : केंद्र सरकारनं नोटा रद्द केल्यानंतर बँका, एटीएमसमोर रांगा नाहीत, असं एकही गाव सापडणार नाही. असं तुम्हाला वाटत असेल तर थोडा वेळ थांबा. देशात एक गाव असं आहे जिथं ना रांगा आहेत ना सुट्या पैशांची चिंता. ना 2000ची नोट कुठे मोडायची याची विवंचना.
हे गाव आहे गुजरातमधलं साबरकाठा जिल्ह्यातलं अकोद्रा. इथं दूध आणि भाजीपाल्यासाठी कुणी खिशातून एक रुपयाही बाहेर काढत नाही. देशात सगळीकडे सुट्या पैशांची टंचाई असली तरी या गावात असलं काहीच नाही. कारण हे आख्खं गावच कॅशलेस आहे. छोटा-मोठा प्रत्येक व्यवहार इथे ऑनलाईन होतो. अंदाजे 1200 लोकवस्तीचे हे गाव खिशात हातच घालत नाही. डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगवरूनच सगळी खरेदी होते. त्यामुळेच गावातल्या बँकांमध्ये रांगाच नाहीत.
गावातले सगळेच लोक नोकरदार आहेत आणि त्यांच्या अकाऊंटलाच वेतन जमा होते, असेही नाही. अन्य कोणत्याही छोट्या गावाप्रमाणेच शेती आणि पशुपालन हाच इथला मुख्य व्यवसाय. दुधाची रोज विक्री होते. पण कोणत्याच व्यवहारासाठी रोख रक्कम द्यावी लागत नाही. व्यवहार सुरळीत व्हावेत, यासाठी गावात फ्री वायफाय सुविधाही उपलब्ध आहे.
गावाच्या शाळेमध्ये उपस्थिती नेहमीच चांगली असते आणि तिथं दांडीही मारता येत नाही, कारण इथली हजेरी बायोमेट्रिक होते. गावात नेमकं पशुधन किती आहे, याची आकडेवारीही ऑनलाईन उपलब्ध आहे. आता हे गाव स्मोक फ्री बनवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक गोबरगॅस प्लांटही उभारले गेलेत. अकोद्रा हा आपल्या स्वप्नातला ग्रामीण भारतातील मिनी भारतच म्हणावा लागेल.