नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकरिता एक खूषखबर. भारतीय रेल्वे आता बेबी फूड (बाळांचे खाणे) स्टेशनवर उपलब्ध करुन देणार आहे. तशी घोषणा आज करण्यात आलेय. 'जननी सेवा' असे या योजनेचे नाव असणार आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवास करतांना सोबत बाळ असलेल्या महिलांचे हाल होऊ नयेत म्हणून आजपासूनच रेल्वे स्टेशनवर पाणी, गरम दूध यांसारखे बाळासाठी आवश्यक खाणे या योजनेअंतर्गत पुरविले जाईल. त्यामुळे आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आय.आर.सी.टी.सी) च्या स्टॉल्सवर बेबी फूड उपलब्ध असेल.


नवी दिल्ली, मुंबई सेंट्रल, पुणे, नागपूर, सूरत, लखनऊ, चेन्नई, हावडा, मुरादाबाद यांसारख्या अन्य २५ स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध असेल. ही सेवा रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांना खूष करण्यासाठी आम्ही सुरू केली आहे, असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.


एका महिलेने प्रवास करतांना ट्रेनमध्ये बाळासाठी दूध न मिळाल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभूंना ट्विट केले. याची आम्ही दखल घेऊ, असे आश्वासन दिले होते. म्हणूनच आज आम्ही ही सेवा सुरू केली, असे प्रभू यांनी स्पष्ट केले.
 
२०१६-१७ च्या रेल्वे बजेटमध्ये रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी या योजनेची घोषणा केली. ३ महिन्यानंतर ही योजना अमलात येत आहे. आम्ही रेल्वे बजेटमध्ये दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यातील अनेक आम्ही पूर्ण केलीत तर काहींवर काम सुरू आहे, असे प्रभू यांनी ही योजना लाँच करतांना सांगितले.