नवी दिल्ली : पठाणकोटवर हल्ला करणाऱ्यांना 'निश्चितपणे' धडा शिकवू, अशी घोषणाच संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्रिकरांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा संस्थांच्या माध्यमातून माहिती मिळण्याआधीच हे दहशतवादी पठाणकोट हवाई अड्ड्यात घुसले असण्याची शक्यता आहे. पर्रिकर पुढे म्हणाले की 'भारत आता आपली सहनशीलता गमावत चालला आहे'. आता भारत 'इट का जवाब पत्थर से' अशी भूमिका घेऊ शकतो असे पर्रिकर म्हणाले. या हल्ल्यासाठी आम्हाला प्रवृत्त करणारे पाकिस्तानात आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.  


पुढे मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की 'आता आपल्याला काहीतरी ठोस योजना आखणे महत्त्वाचे आहे. आपल्याला जे त्रास देतात त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. आज आपण कोणत्याही देशाविरुद्ध कारवाईची भाषा करत नाही कारण, देशाविरुद्ध कारवाई म्हणजे युद्ध असते. पण, आपण दोषींना शिक्षा द्यायलाच हवी. आता ही कारवाई कधी कारायची त्याची वेळ मात्र भारत ठरवेल'. 


याप्रकारची कारवाई कधी आणि कुठे केली जाईल याची सार्वजनिकरित्या वाच्यता केली जाऊ शकत नाही, त्यामुळे याविषयी जास्त खोलात जाऊन बोलण्यास त्यांनी नकार दिला.