14 महिन्यांच्या परीसाठी ट्विटरवरुन केली जातेय प्रार्थना
सीमेपल्याड पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात 14 महिन्यांची चिमुरडी मोठ्या प्रमाणात जखमी झालीये. परीची स्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेय. पुढील काही तास तिच्या प्रकृतीबाबत चिंताजनक आहेत.
जम्मू : सीमेपल्याड पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात 14 महिन्यांची चिमुरडी मोठ्या प्रमाणात जखमी झालीये. परीची स्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेय. पुढील काही तास तिच्या प्रकृतीबाबत चिंताजनक आहेत.
सोशल मीडियावर या चिमुकल्या परीसाठी प्रार्थना केली जातेय. ती बरी व्हावी यासाठी #prayforpari या नावाने हॅशटॅग ट्रेंडिंग करतेय.
जम्मूजवळील सांबा जिल्ह्यात राहणारी ही चिमुकली परी आणि तिचे कुटुंबिय भाऊबीजेनिमित्त नातेवाईकांकडे निघाले होते. यावेळी पाकिस्तानने केलेल्या माऱ्यात चिमुकली जखमी झालीये. तसेच तिचे आजोबा, आत्या आणि दोन भाऊ यांचा मृत्यू झाला. तर परीचे वडीलही यात जखमी झालेत.
या चिमुकल्या परीला जम्मूच्या जीएमसीएच रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आलेय. डॉक्टरांच्या माहितीनुसार, छर्रे लागल्याने परीच्या गळ्याच्या नसा फाटल्या गेल्यात. ज्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होतोय. बुधवारी तिचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन यशस्वी झाले असले तरी अद्याप धोका मात्र टळलेला नाहीये.
भारताने सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केल्यानंतर पाकिस्तानकडून तब्बल 60हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेय. गेल्या दहा दिवसांत झालेल्या गोळीबारात सैन्य आणि बीएसएफचे 8 जवान शहीद झालेत तर 9 नागरिकांचा मृत्यू झालाय.