नवी दिल्ली : पाकिस्तानने काश्मीर मुद्यावरुन नवं कारस्थान करण्याची तयारी सुरु केली आहे. काश्मीरमध्ये सततच्या दहशतवादी कारवायांकरता पाकिस्तान प्रोत्साहन देतच असत मात्र याखेरीज पाकिस्ताननं आता वेगळंच षडयंत्र आखलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पटलावर मांडण्याची तयारी पाकिस्ताननं सुरु केली आहे. त्यानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २२ खासदारांचं एक पथक तयार केलं आहे. हे पथक, जगातल्या महत्त्वाच्या अकरा देशांच्या प्रमुखांना भेटणार आहे. आणि त्यांच्याकडे हे पथक काश्मीर प्रश्न आणि तिथली परिस्थिती मांडणार आहेत. याद्वारे भारताची बदनामी करण्याचा डाव पाकिस्तान खेळणार आहे. 


पाकिस्तानवर भारताचा पलटवार...


परदेश राज्य मंत्री एमजे अकबर यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. एखादी चुकीची गोष्ट २२ लोकांनी २२ वेळा किंवा २२ हजार वेळाही परत परत म्हटली म्हणजे ती गोष्ट खरी होत नाही, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानला फटकारलंय. 


काश्मीरचा मुद्दा हा द्विपक्षीय मुद्दा आहे... पाकिस्ताननं या मुद्याचं आंतर्राष्ट्रीयकरण करू नये... पण पाकिस्तानला आपल्या खासदारांना मुक्त फेरफटक्यासाठी पाठवायचंय तर हा त्यांचा खासगी अधिकार आहे, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला टोलाही हाणलाय.