नवी दिल्ली : पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संयुक्त सुरक्षा पथकाने पुन्हा एकदा दांभिकपणा केला आहे. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला हे सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे देण्यात भारतीय अधिकारी अपयशी झाल्याचे या पथकाने म्हटले आहे. हेच काय तर पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी भारतानेच हा हल्ला घडवून आणला अशी मुक्ताफळं या पथकाने उधळली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान टुडे या वृत्तपत्रानुसार या पथकाने त्यांच्या भेटीचा अहवाल तयार केला असून आता तो पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सादर केला जाणार आहे. 


१ आणि २ जानेवारीला पठाणकोट येथील भारताच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्थळाला पाकिस्तानच्या पथकाने भेट दिली होती. भारतीय तपास यंत्रणांनी त्यांना या परिसराची माहिती दिली होती. दहशतवादी कुठुन आले आणि कसे गेले याची माहिती त्यांना देण्यात आली. 


या वृत्तपत्राने नमूद केलेल्या सूत्रांच्या मते 'या अहवालात म्हटले आहे की भारताला या हल्ल्यांची पूर्वकल्पना होती. कोणतेही पुरावे नसताना पाकिस्तानविरुद्ध खोटा प्रचार चालू ठेवण्यासाठीच भारताने या हल्ल्यांचा वापर करुन घेतला. 


हे दहशतवादी पाकिस्तानातून आले हे सिद्ध करण्यास भारतीय तपास यंत्रणांना अपयश आले, तसेच हल्ला झाल्यानंतर काही तासांतच भारतीय सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांचा खात्मा केला, असेही या अहवालात म्हटले आहे. 'जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी हे तीन दिवसांचे नाटक रचले आणि त्यातून पाकिस्तानला बदनाम करण्याचा घाट घातला,' असेही या वृत्तपत्राने पुढे म्हटले आहे. 


भारतात पाच दिवसीय दौऱ्यावर आलेले हे पथक रविवारी मायदेशी रवाना झाले. या तपासादरम्यान त्यांना चार दहशतवाद्यांच्या डीएनएचे नमुने, त्यांची दूरध्वनी संभाषणे तसेच या दहशतवाद्यांचे जैश-ए-मोहम्मदशी असलेले संबंध यांचे सर्व पुरावे देण्यात आले. 


'पठाणकोटचा हल्ला म्हणजे भारतीय लष्कराने पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी रचलेले एक खोटे नाटक होते,' असे या अहवालाच्या शेवटी नमूद केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.