हार्दिक पटेलची जामिनावर सुटका
सूरत : पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याची आज 9 महिन्यांनंतर लाजपोर तुरूंगातून जामिनावर सुटका झाली. गेल्या आठवड्यात 22 वर्षीय हार्दिक पटेलला गुजरात उच्च न्यायालयाने राजद्रोह आणि विसनगर आमदार कार्यालयातील हिंसेप्रकरणी जामीन मंजूर केला.
तुरूंगाबाहेर आल्यानंतर त्यांनी 'हमें 56 इंच का सिना नही अपने समुदाय के लिए अधिकार चाहिए' असं म्हणत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. 2014 लोकसभा निवडणुकीतील 56 इंच का सिना या भाजपच्या प्रचार मोहीमेसंदर्भात त्यांनी ही टीका केली. पटेल समुदायाला ओबीसी समाजात सामावून घेण्यासाठी यापुढेही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही त्याने सांगितले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुटकेनंतर 48 तासांच्या आत हार्दिक पटेलला गुजरात सोडावं लागणार आहे. त्यानंतर 6 महिने त्याला राज्यात परतता येणार नाही. राज्यसरकारशी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत या आंदोलनाचा कोणत्याही पक्षाने राजकीय फायदा घेऊ नये आवाहन त्याने केलं आहे.