नवी दिल्ली: पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्तापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यासोबतच्या शांततेसाठीच्या चर्चा थांबवण्यात आल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांची नजिकच्या भविष्यकाळामध्ये कोणतीही बैठक नियोजित नसल्याचंही बसीत म्हणाले आहेत. 


पाकिस्तानला भारताबरोबर चांगले संबंध हवे आहेत, पण पाकिस्तानमध्ये अराजक पसरवण्याचा कोण प्रयत्न करतंय हे सगळ्यांना माहिती आहे, अशा उलट्या बोंबाही बसीत यांनी मारल्या आहेत. यासाठी त्यांनी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या कुलभुषण यादव यांचा दाखला दिला आहे. 


कुलभुषण यादव हे भारतीय गुप्तचर संस्था रॉ चे एजंट असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. त्यांना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. 


पाकिस्तानची ही भूमिका म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना धक्का मानला जात आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये मोदींनी पाकिस्तानला भेट देऊन दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते.