नवी दिल्ली : नोटबंदीनंतर काळा पैसा सफेद करण्यात आला. पेट्रोलपंप आणि गॅस सिलेंडर वितरकांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा केला. अशा देशभरातील पेट्रोल पंप आणि गॅस सिलेंडर वितरकांवर आयकर विभागाने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळ्यापैशांवर अंकुश लावण्यासाठी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्यात आल्या. पण पेट्रोलपंप आणि गॅस सिलेंडर वितरकांकडे जुन्या नोटा ३ डिसेंबरपर्यंत घेतल्या जात होत्या. अशातच आयकर विभागाला शंका आहे की, पेट्रोलपंप मालकांनी याचा फायदा घेत काळापैसा पांढरा केला असावा. पेट्रोलपंप मालकांनी बँक खात्यांमध्ये किती पैसा जमा केला आणि किती विक्री केली. विक्री रक्कम आणि बँकेत जमा केलेली रक्कम यांच्यात मेळ आहे का हे आयकर विभाग आता तपासणार आहे.


आयकर अधिकारी या कारवाईला छापा नाही तर रूटीन सर्वे असल्याचं म्हणत आहेत. पण नोटबंदी दरम्यान पेट्रोल पंपाकडून विक्री रक्कमेपेक्षा १५ टक्के रक्कम अधिक बँकेत जमा केल्याचं समोर आलं आहे. ६ मार्चपासून पेट्रोलपंप आणि गॅस वितरकांच्या कार्यालयात जाऊन हा सर्वे केला जात आहे. जमा केलेल्या पैशांची जर योग्य माहिती नाही देता आली तर अशांवर कारवाई केली जाणार आहे.