पंतप्रधान मोदी आणि सेना प्रमुखांच्या देखरेखेखाली झाली संपूर्ण कारवाई
सैनिकांनी ऑपरेशन केलं यशस्वी
नवी दिल्ली : काल रात्री सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतावादी कारवाया रोखण्यासाठी पाकला भारतीय लष्कारने जोरदार झटका दिला. लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे दहशतवादी तळ लष्कराने उद्ध्वस्त केले. काल दहशतवाद्यांच्या काही टोळ्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होत्या यावेळी लष्करानं नियंत्रण रेषेपलिकडे दोन किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे सात तळ उधळून लावले. त्यासाठी हेलिकॉप्टरनं सैनिकांना पाकिस्तान नियंत्रित भागात उतरवण्यात आलं. या सैनिकांनी दहशतवादी तळांवर हल्ले चढवून पहाटे सहा वाजता ऑपरेशन यशस्वी केलं.
रात्री साडे बारा ते सहा या काळात करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती आज सकाळी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आली. यापुढे असे हल्ले करण्याचा इरादा नाही. पण पाकनं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबललं नाही तर, अशा कारवाया कराव्या लागतील असं लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
अमेरिकेने जसं पाकिस्तानात जाऊन लादेनला ठार केलं होतं तशीच रणनिती भारतीय लष्कराकडून आखली गेली. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय लष्काराने सर्जिकल स्ट्राइकसाठी जवानांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या.
लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेचे सैनिक जेव्हा पाकिस्तानात कारवाई करत होते तेव्हा त्याचे सगळे अपडेट राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मिळत होते. त्यांच्या देखरेखेखाली ही सगळी कारवाई झाली. त्याच प्रकारे भारतीय लष्काराची सुरु असलेली कारवाई ही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्काराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या देखरेखे खाली झाली. पंतप्रधान मोदी देखील या कारवाईवर नजर ठेवून होते. या कारवाईत भारतीय लष्करातील सगळे जवान सुखरुप आणि यशस्वी होऊन परतले.