नवी दिल्ली :  धुमसत्या काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरिय बैठक बोलावण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीला पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, गृहमंत्री राजनाथ सिंह, गृहसचिव राजीव मेहराषी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित राहिले.


ही बैठक सुमारे दोन तास सुरु होती. बैठकीनंतर काश्मीरला केंद्र सरकारकडून शक्य असेल ती मदत पुरवण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय. तसंच पंतप्रधान मोदींनी काश्मीरच्या जनतेला शांति राखण्याचं आवाहन केलंय. काश्मीरमध्ये कोणत्याही निर्दोष व्यक्तीला कोणतंही हानी पोहचणार नाही, याची काळजी घ्या असं त्यांनी म्हटलंय. 


हिंसाचारात ३० जणांचा बळी


गेल्या शुक्रवारी हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी चकमकीत मारला गेला. त्यानंतर काश्मीरमध्ये हिंसक आंदोलनं उफाळून आली आहेत. गेल्या पाच दिवसात काश्मीरमध्ये ३० जणांचा बळी गेलाय. 


काश्मीरच्या अस्थिर परिस्थितीमुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल सोमवारी अफ्रिकेचा दौरा अर्धवट टाकून भारतात परतले. काल संध्याकाळी गृहमंत्री राजनाथ सिंहांनी काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुसरी उच्चस्तरिय बैठक घेतली. 


हिंसक आंदोलनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीआरफीएफच्या २१ अतिरिक्त कंपन्या काश्मीरमध्ये रवाना करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजनाथ सिंहांनी आपला अमेरिका दौराही रद्द केलाय.