पीपीएफ अकाऊंट असणाऱ्यांसाठी 7 महत्त्वाच्या गोष्टी
पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफच्या योजनेमध्ये अनेकांनी पैसे गुंतवले आहेत.
मुंबई : पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफच्या योजनेमध्ये अनेकांनी पैसे गुंतवले आहेत. चांगला परतावा मिळत असल्यानं पीपीएफमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूयात.
पात्रता
पीपीएफ योजनेमध्ये कोणीही व्यक्ती आपल्या नावानं किंवा अठरा वर्षांच्या खालच्या व्यक्तीच्या नावानं कोणत्याही शाखेमध्ये पीपीएफ अकाऊंट उघडता येतं.
गुंतवणूक मर्यादा
ऑगस्ट 2014 मध्ये केलेल्या नव्या नियामानुसार वर्षभरात गुंतवणुकदाराला कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवता येतात. दीड लाखांच्या वर गुंतवणूक केली तरी त्याचं व्याज गुंतवणुकदाराला मिळत नाही आणि वार्षिक आयकरामध्येही कोणती सूट मिळत नाही. गुंतवणूक करण्यासाठीची ही रक्कम तुम्ही वर्षाला एकाच वेळी किंवा 12 हफ्त्यांमध्ये गुंतवू शकता.
गुंतवणुकीचा कालावधी
या गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षांचा आहे. या कालावधीनंतर गुंतवणूकदार पीपीएफ अकाऊंट 1 वर्ष किंवा 5 वर्षांपेक्षा जास्तच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकतो.
किती असतो व्याज दर
1 एप्रिल 2016 च्या नियमांनुसार पीपीएफ एकाऊंटमध्ये जमा केलेल्या रकमेवर वार्षिक 8.10 टक्के व्याज मिळतं. प्रत्येक वर्षी 31 मार्चला व्याजाची ही रक्कम तुमच्या पीपीएफ अकाऊंटला जमा होतो. तुमच्या अकाऊंटमध्ये महिन्याच्या 5 तारीख ते महिन्याच्या शेवटी असलेल्या कमीतकमी रकेमवर हे व्याज मोजलं जातं.
आयकरामध्ये लाभ
इनकम टॅक्स कायद्याच्या 88 नुसार पीपीएफमध्ये गुंतवणूक केलेल्यांना आयकरामध्ये लाभ मिळतो. या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.
नामांकन
नामांकनाची सुविधा एक आणि एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावानं उपलब्ध आहे.
अकाऊंट ट्रान्सफर
पीपीएफ अकाऊंट गुंतवणुकदाराला दुसऱ्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिस आणि दुसऱ्या बँकेमध्येही ट्रान्सफर करता येतं. ही सुविधा गुंतवणुकदाराला मोफत दिली जाते.