राहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली होणा-या निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतांवरदेखील काँग्रेस लक्ष ठेवून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली होणा-या निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतांवरदेखील काँग्रेस लक्ष ठेवून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
2014ला मोदींना आणि बिहारमध्ये नितीश कुमारांना जिंकवण्यात महत्त्वाचं योगदान दिलेल्या प्रशांत किशोर म्हणजेच पीके यांनी ही रणनिती बनवली असल्याचं बोललं जात आहे. याबरोबरच पीकेंच्या डोक्यात प्रियांका गांधी आणि शीला दीक्षित यांची नावंही असल्याचं समजत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश यादव यांचा सामना करण्यासाठी राहुल गांधी हेच काँग्रेसचा चेहरा असू शकतात, तसंच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला यश मिळालं तर 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्येही फायदा होईल, असं पीकेंना वाटत आहे.
उत्तर प्रदेशातल्या ब्राम्हणांच्या मत पीकेंना महत्त्वाची वाटत आहेत, त्यामुळे जर प्रियांका किंवा राहुल यांच्या नावावर एकमत झालं नाही, तर शीला दीक्षित यांचंही नाव या शर्यतीत येऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
19 मे म्हणजेच 5 राज्यांच्या निवडणुकींच्या निकालानंतरच काँग्रेस 2017 ला उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत महत्त्वाची घोषणा करू शकतं. तर 1 जूनपासून पीके त्यांच्या टीमबरोबर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी कामाला सुरुवात करणार आहेत.