नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथे चार दिवसीय जागतिक सूफी परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. 'ऑल इंडिया उलेमा अॅन्ड मशाईखा बोर्डा'तर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिषदेसाठी २०० पेक्षा जास्त प्रतिनीधी उपस्थित राहणार आहेत. शिवाय अनेक सूफी धर्मगुरू, विद्वान आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या परिषदेत आपला सहभाग नोंदवतील. तीन दिवसीय कार्यक्रमांनंतर चौथ्या दिवशी दिल्लीतील रामलीला मैदानात या कार्यक्रमाचा समारोप होईल.


इस्लामच्या नावाखाली जगभरात फोफावणारा दहशतवाद कसा थांबवता येईल यावर या परिषदेत मुख्यतः विचारमंथन केले जाणार आहे. सूफी परंपरा दहशतवादाला कसा आवर घालू शकते याचाही विचार केला जाणार आहे. त्याचसोबत इस्लाम आणि महिलांचा सहभाग यावरही चर्चा केली जाईल.


शेवटच्या टप्प्यात दहशतवाद आणि वहाबीकरण यांच्या विरोधात एक ठरावही मंजूर केला जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान, सध्या तरी या परिषदेवर दहशतवादाचं सावट आहे. काही मुस्लिम संघटना या कार्यक्रमस्थळी येऊन आपला विरोध दर्शवण्याचीही शक्यता आहे.