नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष आणखीच गाळात चालला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केरळ आणि आसाममध्ये काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. त्यामुळे पक्षाला शस्त्रक्रियेची गरज आहे, अशी भाषा काँग्रेसची नेते करू लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण जे काँग्रेसला तारण्यात सपशेल फेल ठरले, त्याच राहुल गांधींना प्रमोशन देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बुडत्या पक्षासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा कोणताच आधार काँग्रेसवाल्यांना दिसत नाही. त्यामुळेच राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी जोर धरू लागलीय.


सोनिया गांधींच्या जागी राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत तसा ठराव करावा लागेल. या प्रक्रियेसाठी महिनाभराचा अवधी लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या बेनामी संपत्तीच्या आरोपांमुळं सोनिया गांधी अडचणीत आल्यात. अशावेळी राहुल गांधींकडे पक्षाची धुरा सोपवण्यास फायदा होईल, असं मानणारा एक वर्ग काँग्रेसमध्ये आहे.


दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीची धुरा कोणावर सोपवायची, याचाही निर्णय प्रलंबित आहे. ही जबाबदारी राहुल गांधी स्वतः घेणार की प्रियंका गांधींचा चेहरा पुढं आणणार, याकडं देखील सर्वांचं लक्ष लागलंय. उत्तर प्रदेश निवडणूक ही राहुल गांधींसाठी अग्निपरीक्षाच असणार आहे. त्यांच्या नेतृत्वाची आणि देशाच्या राजकारणाची दिशा ही निवडणूक ठरवणार आहे.