नवी दिल्ली : खासदार रवींद्र गायकवाड यांना एअर इंडियाकडून दुय्यम वागणूक मिळाल्या विरोधात, आज शिवसेना संसदेत आवाज उठवणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायकवाड यांच्या प्रवासावर एअर इंडियानं बंदी घातली आहे. दिल्लीतून गायब झालेले रवींद्रर गायकवाड अद्याप नॉट रिचेबल आहेत. मात्र ते बुधवारी संसदेत हजर राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर गायकवाड प्रश्नी संसदेत कोणती व्यूहरचना आखायची? यासाठी आज शिवसेना खासदारांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.


या बैठकीला ज्येष्ठ नेते आनंदराव आडसूळ, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, अनिल देसाई उपस्थित असतील. गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी आणलेली बंदी म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन आहे. त्यामुळे विमान कंपनी विरोधात हक्कभंग आणता येऊ शकतो. मात्र, हक्कभंग आणायचा असेल तर रवींद्र गायकवाड यांना लोकसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव द्यावा लागेल... तसेच स्वतःही उपस्थित रहावं लागेल. मात्र, हक्कभंग आणायचा की चर्चेची मागणी करायची? यावर शिवसेना रणनीती ठरवणार आहे.


दरम्यान, विमान वाहतूक मंत्री गजपती राजू कोणाची बाजू घेणार? यावर रवींद्र गायकवाड यांचं भवितव्य अवलंबून असेल... तर दिल्ली पोलीस गायकवाड यांना अटक करण्यासाठी रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


उमरगामध्ये साजरा होणार गायकवाडांचा पाडवा?


दरम्यान, बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती, सूत्रांकडून मिळतेय. रवींद्र गायकवाड एअर इंडियाविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर उमरगामध्ये शिवसैनिकांसोबत रवींद्र गायकवाड गुढीपाडवा साजरा करतील, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय. 


दरम्यान, आज खासदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ शिवसेनेनं उमरगा बंदची दिली गेलीय. तर अजूनही रवींद्र गायकवाड यांचा मोबाईल स्वीच ऑफच आहे.