खडसेंवर आरोप सिद्ध झाल्यास कारवाई - केंद्रीय गृह राज्यमंत्री
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे संबंध असल्याच्या कथित प्रकरणात कारवाईपूर्वी, त्यांच्यावरील आरोप आधी सिद्ध होणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे संबंध असल्याच्या कथित प्रकरणात कारवाईपूर्वी, त्यांच्यावरील आरोप आधी सिद्ध होणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे.
मात्र खडसेंवर जर आरोप सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कारवाई करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असेही रिजिजू यांनी यावेळी सांगितले आहे.
ज्या क्रमांकावर हे फोन आल्याचा दावा केला आहे तो क्रमांकच वापरात नाही असे खडसे यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी २२ मे रोजी असे स्पष्ट केले होते, की खडसे यांच्या सेलफोन नंबरची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून त्यात दाऊदला फोन केल्याचे किंवा दाऊदने त्यांना फोन केल्याचे दिसून आलेले नाही.
आम आदमी पक्षाच्या प्रवक्तया प्रीती शर्मा मेनन यांनी गेल्या आठवडय़ात असा आरोप केला आहे की, खडसे यांना दाऊदची पत्नी मेहजबीन शेख हिने ४ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या काळात अनेकदा दूरध्वनी केले होते.
या सगळ्या प्रकरणात कारवाईच्या शक्यतेबाबत विचारले असता रिजिजू यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यातील माहितीची सत्यासत्यता तपासून पाहावी लागेल.
खडसे यांच्यावर आम्ही कारवाई करणार नाही असे मुळीच नाही, पण त्याआधी त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्याबाबतच्या माहितीची सत्यासत्यता तपासली पाहिजे. खडसे यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.