राष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार, डॉ. जोशी, विराट कोहलीचा पुरस्काराने गौरव
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्यांच्या सामाजिक जीवनातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनादेखील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्यांच्या सामाजिक जीवनातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनादेखील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.
राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरणाचा सोहळा उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांमध्ये उच्च कामगिरी करुन देशाची मान उंचावणाऱ्या दिग्गजांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन्मान केला आहे.
पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवार, मुरली मनोहर जोशी यांच्यासह संगीतकार आणि गायक येसूदास, आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव, अंतराळ संशोधक उडुपी रामचंद्र राव यांचा समावेश आहे. तर लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा आणि माजी केंद्रीय मंत्री सुंदर लाल पटवा यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल विश्व मोहन भट्ट यांना गौरवण्यात आले. तर प्रोफेसर देवी प्रसाद द्विवेदी यांना शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
तेहेमटॉन उडवाडिया यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी रत्न सुंदर महाराज यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच स्वामी निरंजन नंद सरस्वती, प्रिन्सेस महा चक्री सिरींधोर्न, चो रामास्वामी यांचाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
७५ जणांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव केला. यामध्ये गायक कैलाश खेर, गायिका अनुराधा पौडवाल, क्रिकेटपटू विराट कोहली, थाळीफेकपटू विकास गौडा, कुस्तीपटू साक्षी मलिक, जिमनॅस्ट दीपा कर्माकर, हॉकीपटू श्रीजेश, अॅथलिट दीपा मलिक यांच्यासह कला, नृत्य, चित्रपट, नागरी सेवा, शिक्षण, साहित्य, पत्रकारिता, कृषी, सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दिग्गजांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.