आई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही - कोर्ट
आई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी `दया` दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय.
नवी दिल्ली : आई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय.
केवळ पालकांनी परवानगी दिली तरच मुलगा त्यांच्या घरात राहू शकतो. केवळ पालक-मुलाचं नातं आहे म्हणून आयुष्यभर त्याचा 'भार' पालकांनी वाहणं बंधनकारक नाही, असंही यावेळी कोर्टानं म्हटलंय.
जेव्हा आई-वडील त्यांच्या स्वत:च्या घरात राहत असतील... आणि त्यांचा मुलगा विवाहीत असो किंवा नसो... तो कुठल्याही प्रकारे आई-वडिलांच्या घरावर कायदेशीररित्या हक्क सांगू शकत नाही, असं न्या. प्रतिभा रानी यांनी निर्वाळा देताना म्हटलंय.
काय होतं प्रकरण...
एका मुलानं आणि त्याच्या पत्नीनं मुलाच्या आई-वडिलांविरुद्ध खटला दाखल केला होता. परंतु, या खटल्याचा निकाल त्याच्या आई-वडिलांच्या बाजुने लागला.
आई-वडिलांच्या घरात राहण्याचा आपल्याला 'अधिकार' आहे... आणि म्हणून त्यांच्या घराचा एका मजल्यावर आपला 'हक्क' आहे, असं मुलाचं म्हणणं न्यायालयानं साफ धुडकावून लावलं.
आपल्यासोबत राहणाऱ्या आपल्या मुलानं आणि सुनेनं आपला छळ करत असल्याचं ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई-वडिलांचं म्हणणं होतं.
आई-वडिलांची प्रॉपर्टी असलेल्या घरावर आपला कोणत्याही प्रकारे कायदेशीर अधिकार असल्याचं मुलगा कोर्टासमोर सिद्ध करू शकला नाही. परंतु, ही प्रॉपर्टी विकत घेताना आपलाही त्यात वाटा असल्याचं मुलाचं म्हणणं होतं.