कंडोम पाकिटावर छापलेल्या फोटोबाबत सुप्रीम कोर्टने मागवला जबाब
कंडोमच्या पाकिटावरील जे फोटो छापण्यात येतात ते अश्लिलतेसंदर्भातील कायद्याचे उल्लंघन करतात का, यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
नवी दिल्ली : कंडोमच्या पाकिटावरील जे फोटो छापण्यात येतात ते अश्लिलतेसंदर्भातील कायद्याचे उल्लंघन करतात का, यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
हिंदुस्तान लॅटेक्स आणि अन्य कंडोम उत्पादकांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले. सर्वोच्च न्यायलयाच्या या आदेशामुळे अतिरिक्त महाधिवक्ता मणिंदर सिंग यांना आता पाहाणी करुन तसा अहवाल द्यायचा आहे.
सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने मंगळवारी मणिंदर सिंग यांना याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले. कंडोमच्या पाकिटांवरील या जाहिरांतीवर कारवाई करावी किंवा करू नये, हे तुम्ही आम्हाला सांगा. त्यासाठी या जाहिरांतीचे परीक्षण करा आणि आम्हाला तुमची भूमिका कळवा, असे खंडपीठाने महाधिवक्त्यांना बजावलेय.
कंडोमबाबत जाहिराती अश्लिलतेसंबंधीच्या मर्यादा आणि कायद्याचे उल्लंघन करतात का याची पाहणी करा. तसे असल्यास या जाहिरातींचे नियमन करण्यासाठी तुमच्याकडे योजना आहे का? कंडोमच्या या पाकिटांवर काय छापले जाते, हे तुम्ही तपासू शकता का किंवा बाजारात आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता, यासंबंधीचे स्पष्टीकरण अहवालात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.