बडतर्फीच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार - तेज बहादूर यादव
`बीएसएफ`चा जवान तेज बहादूर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय. या निर्णयाविरुद्ध आपण कोर्टात न्याय मागणार असल्याचं यादव यांनी स्पष्ट केलंय.
नवी दिल्ली : 'बीएसएफ'चा जवान तेज बहादूर यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय. या निर्णयाविरुद्ध आपण कोर्टात न्याय मागणार असल्याचं यादव यांनी स्पष्ट केलंय.
अतिशय निष्कृष्ठ दर्जाचं जेवण बीएसएफ जवानांना दिलं जात असल्याची परिस्थिती त्यांनी व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर समोर आणली होती. 'कॉन्स्टेबल रँकच्या जवानानं बीएसएफवर खोटे आरोप' केल्याचा अहवाल या प्रकरणातल्या चौकशी अधिकाऱ्यांनी दिलाय. बीएसएफच्या नियमांचं उल्लंघन करत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या निर्णयाच्या विरोधात अर्ज करण्यासाठी त्यांच्याकडे तीन महिन्यांचा कालावधी असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.
मात्र, यावर तेज बहादूर यादव यांनी नाराजी व्यक्त केलीय. 'मला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय... याविरुद्ध मी उच्च न्यायालयात जाणार आहे... मला न्याय मिळेल, अशी आशा आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे... जेव्हा तुम्ही सत्य परिस्थिती समोर आणता तेव्हा हे घडतं... आणि गेली अनेक वर्ष असंच घडतंय', असं म्हणत यादव यांनी आपल्यावरच्या कारवाईवर निराशा व्यक्त केलीय.
यादव यांनी जानेवारी 2017 मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. बीएसएफ जवानांच्या दिल्या जाणाऱ्या निष्कृष्ठ दर्जाचं जेवण यामध्ये दिसत होतं.