कोची शहरात गरीबांना अन्न देतो हा `आनंदाचा रेफ्रिजरेटर`
कोची : भारतासारख्या देशात जिथे करोडो लोक दररोज भुकेल्या पोटी झोपतात त्याच देशात दररोज लाखो माणसं खाऊ शकतील इतकं अन्न वाया जातं. हा विरोधाभास भारतात ठिकठिकाणी जाणवतो.
कोची : भारतासारख्या देशात जिथे करोडो लोक दररोज भुकेल्या पोटी झोपतात त्याच देशात दररोज लाखो माणसं खाऊ शकतील इतकं अन्न वाया जातं. हा विरोधाभास भारतात ठिकठिकाणी जाणवतो.
याच समस्येचा सामना करण्यासाठी केरळमधील एका महिलेने शक्कल लढवली आहे. मिनू पॉलिन या महिलेने आपल्या रेस्टॉरंबाहेर एक फ्रिज लावला आहे ज्यात शहरातील लोक त्यांच्या घरातील उरलेलं अन्न ठेवू शकतात ज्याचा फायदा गरीब लोक उचलू शकतात.
कोची शहरात असणारं 'पप्पाडावाद' हे रेस्टॉरंट मिनू पॉलिन चालवतात. गरीबांना अन्न मिळावे या अपेक्षेने त्यांनी हा लहानसा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या रेस्टॉरंटबाहेर एका झाडाखाली त्यांनी हा फ्रिज ठेवला आहे. 'नन्म मारम' म्हणजेच 'आनंदाचं झाड' असं नाव त्यांनी या फ्रिजला दिलंय.
काहीच दिवसांपूर्वी चालू केलेल्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांनी सुरुवातीला शेजारच्या हॉटेलमधून खाद्यपदार्थ आणून ठेवण्यास सुरुवात केली. पण, आपल्या घरात उरलेलं अन्न फेकून देण्यापेक्षा ते इथे आणून ठेवा अशी विनंती मिनू यांनी लोकांना केली.
सध्या काही गरीब आणि बेघर लोकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. 'शहरात अनेक लोक रोज काही न खाता झोपी जातात. मला त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज वाटली. म्हणून मी हा प्रयत्न सुरू केला. समाज आपल्याला बरंच काही देत असतो. तेव्हा आपणही या समाजाला थोड्या प्रमाणात का होई ना मदत करावी' असं मिनू यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं.
भुकेल्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हीच आपल्याला मिळणारी सर्वात मोठी पोचपावती असल्याचं मिनू यांना वाटतं.